जळगाव;- गेल्या सात वर्षांपासून मनपाच्या अनुकंपा धारकांची नियुक्ती रखडली असून ती करावी या मागणीसाठी आजपासून अनुकंपा धारकांनी आमरण उपोषण आरंभिले आहे . यात अनुकंपा धारकांना त्वरित नोकरीवर घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या उपोषणामध्ये उदय जैन, प्रसाद पाठक, गजानन मोरे, चेतन सैदाणे, विशाल सुर्वे, किरण देवरे, शुभम कोतकर, मुकेश पाटील, महेश शिंपी, चेतन खोंडे आदी सहभागी झाले आहेत.
महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळत नसून प्रतीक्षा सूचीवरील वारसांचे नोकारीचे वय उलटून गेल्यास त्यांना नोकरीची संधी गमवावे लागेल. आज अनुकंपा नियुक्तीसंदर्भात सर्व शासन निर्णय, नियम अनुकूल आहेत. तसेच महापालिकेत पदे रिक्त असतांना देखील नियुक्ती मिळत नाही. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी वारसांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. महासभेत अनुकंपाधारकांच्या वारसांना एका महिन्याच्या आत नियुक्ती देण्यात यावेत असा ठराव २००५ मध्ये करण्यात आला होता. मात्र, या ठरावाची देखील अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.








