मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह घरातच ठेवल्याची घटना जालना शहरातल्या चंदनझिरा परिसरात घडली आहे. मुंबईच्या सांताक्रुझमधील एक 73 वर्षीय वृद्ध व्यक्ती तीन दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जालन्यात आला होता. मात्र इथे आल्यानंतर नातेवाईकांच्या घरीच त्याचा मृत्यू झाला. सध्या जगभर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळं या वृद्धाचाही कोरोनामुळंच मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी वृद्धाचा मृतदेह पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत एका खोलीत ठेवला.दरम्यान ही माहिती मिळताच प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. वृद्धाच्या मुंबई येथील नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी वृद्धाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलांय. दरम्यान हृदय विकाकराच्या झटक्यानं वृद्धाचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. शवविच्छेदनाच्या अहवाला नंतरच वृद्धाच्या मृत्यूचं कारण कळू शकेल.