नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतूक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे सांगितले आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा झालेला अपमान दुर्दैवी असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे.

करोना काळात सरकारने योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे सांगत राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले.
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपती म्हणाले, सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटीपेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता.
सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करते. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी संगितले.
तसेच, आमचे सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाले आहेत.







