कोलकाता (वृत्तसंस्था) – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गांगुलीला बुधवारी पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता. मात्र आज पुन्हा त्याला त्रास जाणवू लागला आहे.


सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीपासून सौरव गांगुलीच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्याने डॉक्टरांशी बातचित केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. नुकतीच माहिती मिळाली आहे की, गांगुलीच्या कुटुंबीयांनी नुकतेच त्याला रुग्णालयात नेले आहे.
ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.
सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.







