वुहान : चीनमधील वुहान शहरामधील मांसविक्री केल्या जाणाऱ्या बाजारपेठेमधून प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील १८३ देशामध्ये करोनाचा विषाणू पसरला आहे. तर दुसरीकडे चीनच्या सरकारचे देशातील परिस्थिती पूर्ववत झाल्याचे सांगत इथल्या मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बाजारपेठा सुरु होताच चिनी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
एका इंग्रजी वार्मपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी चीनमधील मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा सुरु करण्यात आल्या. या बाजारपेठांचे फोटो समोर आले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याने चीनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चीनमधील वेगवेगळ्या शहरांमधील मांस विक्रीच्या बाजारपेठा पुन्हा सुरु झाले आहेत, असं डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या बाजारपेठांमध्ये वटवाघूळ, कुत्री, मांजरी, ससे यांचबरोबर किड्यांची विक्री पुन्हा सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.