कोलकाता (वृत्तसंस्था) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जय श्रीरामचे नारेबाजी झाल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी व्यासपीठावर आल्या असताना जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. या नारेबाजीमुळे व्यथित झालेल्या ममता यांनी भाषण देण्यास नाकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाजपला फटकारलं होतं. आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनीही भाजपला सुनावलं आहे.
नुसरत जहाँ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ‘रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान कालच्या घटनेवरून राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजपाचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं असल्याची वादग्रस्त टीका केला. त्याला नुसरत जहाँ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.







