जळगांव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र आणि ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आज ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडया अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज ऑनलाईन प्रश्न मंजुषा गुगल मीटवर आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा.म.सु. पगारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल चिकाटे हे होते. डॉ.चिकाटे यांनी प्रश्न मंजुषा कार्यक्रमामागची भूमिका विशद करतांना सांगितले की, आधुनिक युगात प्रश्न मंजुषेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक स्पर्धापरीक्षांना सामोरे जाण्याची प्रवृत्ती विकसित होते. विद्यापीठातील ग्रंथ साहित्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुर्यंवशी यांनी केले तर आभार नेत्रा उपाध्ये यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभागपमुख प्रा.मुक्ता महाजन, हिंदी विभागप्रमुख प्रा.सुनील कुळकर्णी, मराठी विभागातील प्रा.आशुतोष पाटील यांच्यासह प्रशाळेतील विद्यार्थी व प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.







