नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात 16 जानेवारीपासून जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. कोरोना लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम जाणवले आहेत. दरम्यान आता ही लस घेणारे एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लस घेतल्यानंतर त्यांनी आपला अनुभव मांडला आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, “लोक कोणत्याही प्रकारची औषधं घेत असतील तर त्यांना लशीमुळे काही अॅलर्जीक रिअॅक्शन होऊ शकते. शरीरात वेदना, लस घेतलेल्या शरीराच्या भागावर वेदना, सौम्य ताप असे सामान्य साइड इफेक्ट होऊ शकतात. पण 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. लशीमुळे हार्ट अटॅक येऊ शकत नाही. देशात लशीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही”
“लसीकरणानंतर मला कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट झाले नाहीत. मी सकाळपासून काम करतो आहे आणि एकदम ठिक आहे. त्यामुळे लोकांनी न घाबरता लस घ्यावी. असे दुष्परिणाम दिसले तर घाबरण्याची गरज नाही. असे दुष्परिणाम जाणवल्यास त्यावर उपचार करण्यासाठी सेंटर तयार करण्यात आले आहेत”, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे. यापैकी तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही लोकांना वॅक्सिनच्या किरकोळ समस्या दिसल्या असल्या तरी, ही सौम्य लक्षणं असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मोदी म्हणाले, ”भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे. आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे”







