मुंबई (वृत्तसंस्था) – इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी बंगळुरुत गेल्याच्या मुद्द्यावरुन मनसेकडून शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरून आपण टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती दिली होती. या भेटीनंतर ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रातच येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता.

मात्र, आता टेस्लाचा प्रकल्प कर्नाटकात गेल्याने मनसेकडून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. टेस्ला कंपनी कर्नाटकात पळाली. पेज 3 मंत्र्यांना झटका. ‘बोलाची कढी, बोलाचा भात’, असे खोचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. कंपनी इथे लक्झरी इलेक्ट्रिक कारची निर्मिती आणि व्यवसाय करणार आहे. बंगळुरुतील एका रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटसह कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.
एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारतात व्यवसाय सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. टेस्लाचे मॉडेल ३ भारतात सर्वप्रथम लाँच केले जाईल. हे टेस्लाचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मॉडेल आहे. याची किंमत 55 लाख इतकी आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या कारचे बुकिंग सुरु होईल.







