इराक (वृत्तसंस्था) – इराकच्या एका न्यायालयाने गेल्या वर्षी एका इराणी जनरल आणि एका प्रभावशाली इराणी नेत्याच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुरुवारी अटकेचे वॉरंट जारी केले आहे. कोर्टाच्या माध्यमप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस यांचा मृत्यू झाला होता, याच प्रकरणी बगदाद न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे वॉरंट जारी केले आहे.

सुलेमानी आणि मुहंदिस हे दोघे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बगदाद विमानतळाच्या बाहेर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते. यामुळे इराक आणि अमेरिकेत राजनैतिक तणाव निर्माण झाला होता आणि या दोन देशांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. याच हत्यांच्या आरोपाखाली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहे.
या दोघांच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी त्यांचा उल्लेख शहीद असा केला होता आणि त्यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचेही म्हटले होते. त्यांनी ट्विटरवर लिहिले होते की, आम्ही अबू माहदी आणि सुलेमानी यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहतो. ते इस्लाममध्ये प्रशिक्षित असलेल्यांचे प्रमुख उदाहरण होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अल्लासाठी संघर्ष करण्यात व्यतीत केले. तर या दोघांच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालयाने म्हटले होते की अमेरिकन राजदूत आणि सैनिकांवर हल्ला करण्याच्या योजनेत जनरल सुलेमानी सक्रीय होते. त्यांची संघटना ही शेकडो अमेरिकन आणि सहकारी सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले होते की, त्यांनी अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याचीही परवानगी दिली होती.
सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही विस्तृत माहिती न देता फक्त अमेरिकेचा झेंडा ट्विट केला होता. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले हे अटकेचे वॉरंट अबू माहदी यांच्या कुटुंबियांच्या न्यायाधिशांनी दाखल करून घेतलेल्या जबानीनंतर काढण्यात आले आहे. कोर्टाने सांगितले आहे की या हत्यांप्रकरणी पुढील तपास अजूनही चालू आहे.







