जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शिव कॉलनीजवळच्या रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका महापालिका कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.
नारायण मांगो हटकर (वय ५८ रा. नंदनवन कॉलनी) हे महापालिकेत व्हॉल्व्हमन म्हणून कार्यरत आहेत. ते आधी तांबापुरा येथे राहत होते. अलीकडेच त्यांनी नंदनवन कॉलनीत घर घेतले होते. आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास ते शिव कॉलनीजवळच्या उड्डाण पुलाजवळ महामार्गावरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधीत ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.