- भारतरत्न अटलजींच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न
- पंतप्रधान मोदींजींच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण,
- खासदार उन्मेशदादा पाटील, किसान मोर्चाचे पोपटतात्या भोळे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक अशी ३ कृषी सुधारणा कायदे देशभरात लागू केले. बाजार समित्या, मूठभर व्यापारी यांच्या जोखडातून शेतकरी मुक्त होणार असून त्यांना आपला शेतीमाल देशात कुठेही विकता येणार आहे. यामुळे एका विशिष्ट वर्गाचे धाबे दणाणले आहे.

पंजाब मधील शेतकऱ्यांचे अर्थकारण व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण वेगळे असून राज्यातील सत्तेत असणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेसच्या नेत्यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ६००० रुपये केंद्र सरकार अनुदान देते. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने १० हजार रुपये प्रतिवर्षी मदत करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेले २५ हजार रुपये हेक्टरी मदत तसेच , भर विधानसभेत २ लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये अनुदान ही आश्वासने महाविकास आघाडी सरकारने पाळावीत, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महत्वकांक्षी अशी जलयुक्त शिवार योजना या सरकारने बंद केली. पोकरा सारख्या शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावणाऱ्या योजनेसाठी या सरकार कडे निधी नाही. शेतकऱ्यांना मका, ज्वारी, बाजरी खरेदी केंद्र बंद पडल्याने नाईलाजाने खाजगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने आधी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात मगच केंद्राच्या कृषी कायद्यांवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार असेल. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी जर आपली जुनी भाषणे जरी पाहीली तरी त्यात त्याच मागण्या त्यांनी केल्या होत्या ज्या आजच्या केंद्राच्या कृषी कायद्यात आहेत. केवळ विरोधासाठी विरोध व राजकारणासाठी राजकारण करू नये असा हल्लाबोल चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर केला.
भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती व सुशासन दिवसा निमित्त भाजपा अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधून #PMKisan निधी अंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18000 कोटी हस्तांतरित करण्यात आले. यानिमित्ताने आज चाळीसगाव येथील भाजपाच्या ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात सदर संवादाचे लाईव्ह प्रक्षेपण ठेवण्यात आले असल्याने उपस्थित शेतकरी व भाजपा पदाधिकारी यांच्यासोबत आदरणीय मोदीजी यांचे विचार समजून घेण्यात आले.
तत्पूर्वी स्व. अटलजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकमसर, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, पंचायत समिती गटनेते संजय तात्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, अँड.प्रशांत पालवे, अमोल नानकर, जेष्ठ नागरिक आघाडीचे दिलीप गवळी, ग्राहक पंचायतीचे रमेश सोनवणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, विरोधक शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. मात्र आजचा शेतकरी सुज्ञ आहे. २०१४ नंतर आदरणीय मोदीजींच्या शेतकरी हिताच्या धोरणांमुळे अनेक बदल शेतकऱ्यांच्या आयुष्यात आले. पूर्वी २ गोण्या युरिया मिळणे शेतकऱ्यांना दुरापास्त होते, मोदींजींनी निम कोटेड युरिया आणून तो मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला त्यामुळे मागील ६ वर्षात युरियाची टंचाई भासली नाही. पूर्वी पीकविमा केवळ नावाला ऐकायला मिळत होता व मूठभर मोठे जमीनदार त्याचा लाभ घ्यायचे मात्र आज छोट्यातल्या छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले व त्याचा प्रत्यक्ष फायदा देखील होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदींजींनी घेतला जो आज शेतकरी हिताचे गळे काढणाऱ्या व ५० वर्ष सत्तेत असणाऱ्या विरोधकांना घेता आला नाही असेही त्यांनी सांगितले.
खासदार उन्मेशदादा पाटील व पोपट तात्या भोळे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी कायद्यांची माहिती देत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल नानकर, प्रास्ताविक प्रा.सुनील निकम यांनी केले तर आभार जितेंद्र वाघ यांनी मानले.







