पहूरचे प्रफुल्ल लोढा यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप

जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहुर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसेंवर गंभीर आरोप केले आहेत. खडसेंचे सुपुत्र निखिल खडसे यांची आत्महत्या झाली नसून हा घातपात आहे. एकनाथराव खडसे यांची बदनामी होते म्हणून निखिल खडसे यांना संपविण्यात आले, असा गंभीर आरोप लोढा पत्रकार परिषदेत यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
लोढा पुढे म्हणाले की, एकनाथराव खडसे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत असून यासंदर्भात राज्यपाल कोश्यारी ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे तक्रार करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
27 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील माझे घर लोढा भवन येथे व सिल्लोड येथील मित्र कोचुरे यांच्या घरी काही फाईल्स तसेच पुरावे मिळवण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पारस ललवाणी तसेच एकनाथराव खडसे यांनी माझ्या घरी धाड टाकली असा गंभीर आरोप देखील लोढा यांनी केला आहे.
पारस ललवाणी यांनी खडसे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊ नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जीवाचे बर वाईट करून टाकू अशी धमकी पारस ललवाणी यांनी दिली असल्याचे लोढा यांनी सांगितले.
माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजप मध्ये असताना त्यांच्यावर भाजप मध्ये अन्याय झाल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मात्र ते स्वतःचे राजकारण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जातात असा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी केला.







