जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकपदी अनिल वांढेकर यांची पुन्हा पदोन्नती झाल्याने नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृहखात्याने राज्यात पंधरा अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांच्या या नेमणुका केल्या आहेत.

दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी की,जळगाव जिल्हा कारागृहात प्रभारी अधीक्षकपदी याआधी अनिल वांढेकर यांनी काम केले आहे. आता त्यांची पदोन्नती झाल्यामुळे जळगावात कारागृह अधीक्षकपदी पूर्णवेळ स्वतंत्र अधीक्षक मिळाला आहे.
त्यांच्यासोबतच नंदुरबार जिल्हा कारागृहाचे अधीक्षकपदी राजू देशमुख यांची नेमणूक झाली आहे. मराठवाड्यासह कोकणातही पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारागृह खात्याच्या नागरी सेवा मंडळाच्या बैठकीत हा पदोन्नत्यांचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अधीन राहून या नेमणुका करण्यात आल्या आहेत. असे राज्य गृह विभागाचे उपसचिव नारायण श्रीकृष्ण कराड यांच्या सहीने जारी झालेल्या राजपत्रात म्हटले आहे.







