नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाची जागतिक बाधा वुहानमधून सुरू झाली. त्याबाबत अनेक अनेक जण आपापले सिध्दांत मांडत आहेत. काही जण हे जैविक अस्त्र असल्याचे ठामपणे सांगत आहेत. तर काही जणांना हा व्यापक कटाचा भाग वाटतो. यासर्वानंतरही 81 हजार 340 जणांना बाधा झाल्यानंतर आणि तीन हजार 292 मृत्यू झाल्यानंतर ही साथ आटोक्यात आणल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चीनचे कौतूक केले आहे. धक्कदायक घडामोडीत फ्रान्सने चीनच्या मृतांचा आकडा मागे टाकला आहे. इटलीत आठ हजार 215 तर फ्रान्समध्ये चार हजार 858 बळी गेले आहेत. तर जगभरात बळींची संख्या 24 हजार 914 वर पोहोचली आहे. तर बाधितांची संख्या पाच लाख 51 हजारांवर गेली आहे. चीनने या साथीचा यशस्वी मुकाबला केल्याचे मानण्यात येत आहे. मात्र हाती आलेल्या नव्या आकडेवारीने चीनच्या या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. इपोक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये गेल्या तीन महिन्यात दोन कोटी 10 लाख मोबाईल कनेक्शन रद्द करण्यात आली आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमुळे ही संख्या एवढी मोठी झाली असावी, असे मानण्यात येत आहे. चीनमध्ये डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. लोक मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत. पेन्शन, सामाजिक सुरक्षा, रेल्वे तिकिट यासारखी कसलीही सरकारशी संबंधित गोष्ट करायची झाली तर मोबाईल आवश्यक ठरतो, असे अमेरिकेत राहणारे चीनचे अभ्यासक तां जिंगयुआन यांनी इपोक टाइम्सला सांगितले. सर्व चीनी नागरिकांना आपल्या मोबाईलवर हेल्थकोड तयार करणे चीन सरकारने अनिवार्य केले आहे. असे कोड तयार करणाऱ्यांनाच चीनमध्ये फिरण्याची मुभा आहे. त्यामुळे अशावेळी कोणी आपले मोबाईल कनेक्शन रद्द करणे केवळ अशक्य आहे, असे तांग यांचे म्हणणे आहे. जर मोबाईल कनेक्शन रद्द करणे हे मृतांच्या आकड्याशी संबंधित असेल तर चीनने जाहीर केलेला मृतांचा आकडा अतिशय लहान भाग आहे.असे सांगून इपोक टाईम्सने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या चुकीच्या धोरणाने आणि गैरव्यवस्थापनामुळे ही साथ जगभर पसरल्याचे म्हटले आहे. ही साथ सुरू झाल्यापासून दोन कोटी 10 लाख कनेक्शन रद्द होणे धक्कादायक आहे, असे यात म्हटले आहे. ही कनेक्शन रद्द होण्यामागे दोन शक्यता व्यक्त होत आहेत. स्थलांतरीत आपल्या गावी गेल्याने त्यांनी आपले कनेक्शन रद्द केले असावे आणि दुसरे म्हणजे कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे दोन किंवा त्यापेक्षा अधिक मोबाईल वापरणाऱ्यांनी आपला खर्च कमी करण्यासाठी दुसरे कनेक्शन रद्द केले असावे. तरीही त्यांची संख्या एवढी असेल का? हेही शंकास्पदच आहे.