इस्लामपूर (प्रतिनिधी) – इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील तब्बल २३ जण करोना बाधित झाल्याने शहर प्रचंड दहशतीखाली आहे. शहरातील चार जण हज यात्रेहून आल्यावर त्यांच्याच घरातील संपर्कात आलेले १९ जण बाधित झाले आहेत. यामुळे शहरात धास्ती वाढली आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुपवर आता युवक आवाहन करीत आहेत. ‘माझ्या इस्लामपूर शहरवासियांना नम्र विनंती आहे की, आपण स्वतःहून प्रशासनाच्या समोर या आणि प्रशासनाला सांगा की मी करोना बाधितांच्या संपर्कात आलो आहे. माझी तपासणी करा. म्हणजे लवकर त्यावरती काळजी घेता येईल. मी इस्लामपुरकर….’ अशा शब्दांत आवाहन करुन प्रतिसादाची अपेक्षा केली जात आहे. इस्लामपूर शहरातील मध्यवर्ती भागात या कुटुंबाचे व्यवसाय आहेत. सध्या हा परिसर पूर्णतः सील केला आहे. या दोन प्रभागातील सर्व रस्ते, निवासी संकुलांचा परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. त्या सर्व भागातील रस्ते बँरिकेट्स लावून बंद केले आहेत. आरोग्य विभागाकडून परिसरातील सर्व घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. आजपर्यत सहा हजार नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. सुरवातीला हज यात्रेवरून आलेल्या चार जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच जण, पुन्हा दोन आणि आज तब्बल १२ जणांना करोना पॉझिटिव्ह असलेचे स्पष्ट झाले. आतां पुढे काय, असा प्रश्न समोर आला आहे.शहरात पोलीस, नगरपालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक रात्रंदिवस, अहोरात्र झटत आहेत. आतां २३ जणांच्या संपर्कात कोण कोण आले, याबाबत स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.