बोलपूर(वृत्तसंस्था) –पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘रोड शो’ला तुफान गर्दी झाली आहे. माझ्या आयुष्यात मी आजवर असा ‘रोड शो’ कधीही अनुभवला नाही. तसेच आता येथील जनतेला परिवर्तन हवे आहे याची साक्ष देणारी ही गर्दी असल्याचे शहा म्हणाले. जनतेने आता यावेळी भाजपला विजयी करण्याचे मनात पक्क केले आहे. ममता बॅनर्जी सरकारविरोधात प्रचंड राग येथील जनतेमध्ये पाहयला मिळत असल्याचे शहा म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. याच अनुषंगाने शहा सध्या प.बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहा यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीपासून ते निवडणुकीसाठीची रणनिती आणि प्रचाराचे काम केले आहे.शहा यांच्यासोबत कैलास विजयवर्गीय, दिलीप घोष आणि इतर भाजप नेते उपस्थित आहेत. बोलपुर चौक ते डाक बंगला असा हा रोड शो आहे.
प.बंगालच्या बीरभूममधील बोलपूर येथून अमित शहा यांच्या ‘रोड शो’ला सुरुवात झाली असून बोलपूर ते हनुमान मंदिर आणि पुढे डाक बंगला येथे रोड शो संपणार आहे.हे अंतर 2 किलोमीटरचे आहे. कोविडच संकट असतानाही शहा यांच्या या ‘रोड शो’ला भाजप समर्थकांनी तुफान गर्दी केली आहे.







