मेदिनीपूर (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी येथील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय. भारतीय जनता पक्षाने येथे आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून भाजपकडून पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसला एकामागून-एक जोरदार धक्के बसत आहेत.

अशातच आज बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अक्षरशः महाभरती पार पडली. आज तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला.
यावेळी बोलताना अमित शाह यांनी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवत निवडणुका येतील तेव्हा ममता बॅनर्जी पक्षात एकट्याच उरतील असं वक्तव्य केलं.
‘जेव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील तेव्हा राज्यात भाजप २०० हून अधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करेल. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणुका येतील तेव्हा ममता बॅनर्जी तुम्ही पक्षात एकट्याच रहाल.’
सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना पक्षांतर करायला लावते. मी दीदींना आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष स्थापन केला, तेव्हा ते पक्षांतर नव्हते का?







