बंगळुरु – कर्नाटक विधानपरिषेदत मंगळवारी गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले.
कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे.
गेल्याच आठवड्यात कर्नाट विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. ‘कर्नाटक मवेशी वध रोकथाम एवं संरक्षण विधेयक-2020’ असे या विधेयकाचे नाव होते. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कर्नाटकात गोहत्येवर बंदी येईल. तसेच गायींची तस्करी आणि गोहत्येत सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या नियमांचा या विधेयकात अंतर्भाव आहे. हे विधेयक 2010 साली भाजपने आणलेल्या कायद्याचे सुधारित स्वरुप आहे.
काँग्रेसचे आमदार काय म्हणाले?
भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना सभापतींच्या आसनावरून खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी व्यक्त केली.







