नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांनी ९ डिसेंबर रोजी येणारा त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी देशातील सर्व कॉंग्रेस प्रदेश शाखा प्रमुखाना वाढदिवस निमित्त केक न कापण्याचे अथवा कोणताही कार्यक्रम न करण्याचे आदेश दिले आहेत. देशावर आलेले करोना संकट आणि आता देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन यामुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सोनियांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

केंद्राने लागू केलेले कृषीविषयक तीन कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कॉंग्रेसने या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच करोना साथीमुळे देशात अनेकांचे प्राण गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला असे समजते.







