राष्ट्रवादीच्या अँड. कुणाल पवार यांचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी) – कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सूचनाफलक अद्ययावत झालेले नसून स्वच्छतेच्या कामासाठी अदा करण्यात आलेली बिले संशयास्पद असून याप्रकरणी होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर सरचिटणीस अँड. कुणाल पवार यांनी केली आहे.
विद्यापीठामध्ये माहिती अधिकार कायद्याचे व्यवस्थित पालन होत नसल्याचेही अँड. पवार यांचे म्हणणे आहे. विद्यापीठातील विविध फलकांवर माहिती अद्ययावत केलेली दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह बाहेरून येणाऱ्या प्राध्यापकांचे हाल होतात. तसेच महिलांविषयी असलेले कायदे आणि वसतिगृहांमध्ये रॅगींगबाबत असणारी माहिती लावलेली दिसून येत नाही.
विद्यापीठामध्ये स्वच्छताविषयी काय कामे केली जातात हा मोठा प्रश्न आहे. कारण अनेक शौचालयांमध्ये प्रसाधन गृहांची दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छता गृहांसाठी लाखो रुपयांची बिले मंजूर होऊन त्याची रक्कम अदा केली जाते. स्वच्छतागृह सफाई होते काय याबाबतची तपासणी केली जाते की, नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव महानगर सचिव अँड. कुणाल पवार, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे यांनी केला आहे.







