मुंबई (वृत्तसंथा) – टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता आणखी विस्तारणार आहे. या विस्तारण योजनेअंतर्गत कंपनी सर्व सेक्टर्समधील त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सुरुवातीला सुपर अॅपद्वारे ऑनलाईन ग्रोसरीच्या व्यवसायात उतरण्याची योजना बनवली. आता मोबाईलचे भाग (पार्ट) बनवण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. यासाठी कंपनी तामिळनाडूमध्ये एक मोठा प्लान्ट उभारण्याच्या तयारीत आहे.
मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भारतात मोबाईलचे पार्ट विकसित करण्याचे आवाहन केले होते. परंतु कोणतीही कंपनी त्यासाठी पुढे आली नाही. अजूनही आपल्या देशातील मोबाईल कंपन्या मोबाईलचे पार्ट इतर देशातून (प्रामुख्याने चीनमधून) मागवत आहेत. अखेर टाटा कंपनीने यामध्ये रस दाखवला आहे. टाटाने त्यासाठी योजनादेखील बनवली आहे. टाटाच्या या योजनेमुळे त्यांचा भारतातील व्यवसाय वाढेलच, परंतु भारत चीनला जोरदार टक्करदेखील देईल.
भारत हा चिनी मोबाईल कंपन्यांचं सर्वात मोठं मार्केट आहे. तसेच भारतातील मोबाईल कंपन्यादेखील चीनमधूनच मोबाईलचे भाग मागवतात. त्यामुळे जर भारत मोबाईलचे भाग आणि मोबाईल बनवण्यात सक्षम बनला तर चीनला मोठा दणका बसेल. भारत आणि चीनच्या सीमेवरील तणावामुळे एका बाजूला देशात सातत्याने boycott china, boycott chinese products चा नारा दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. भारतीय मार्केटमध्ये चांगले मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने चिनी कंपन्यांची देशात मोठी उलाढाल सुरु आहे, असे बोलले जाते. जर भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला तर त्याचा देशाला फायदा होईलच सोबतच चीनलाही मोठा फटका बसेल.
मोबाईलचे भाग बनवण्यासाठी टाटा सन्स कंपनी तामिळनाडूमध्ये मोठा प्लान्ट उभारणार आहे. या योजनेत टाटा समूह तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, टाटा समूह या योजनेसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणार आहे. यापैकी 75 कोटी डॉलर्स ते एक अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम कंपनी एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंगद्वारे जमवणार आहे. टाटा सन्स कंपनीने नव्या प्रकल्पावर सीईओ नेमण्यासाठी शोध सुरु केला आहे.
ग्लोबल रिसर्च फर्म इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (आईडीसी) रिपोर्टनुसार यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित भारतात 5.43 कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. या रिपोर्टचा विचार केला तर दरवर्षीच्या तुलनेत भारतातील मोबाईल विक्रीत 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन आणि अमेरिकेत मात्र मोबाईलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.
रिपोर्टमधील माहितीनुसार भारतात विक्री करणाऱ्या मोबाईल कंपन्यांमध्ये Xiaomi कंपनी सर्वात वर आहे. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित शाओमीने भारतात 13.5 मिलियन (1.35 कोटी) मोबाईल्सची विक्री केली आहे. शाओमीच्या Redmi 8A Dual, Redmi 8 आणि Redmi Note 9 या मोबाईल्सना भारतीय ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या तिमाहित शाओमीचा सब ब्रॅण्ड Poco च्या 10 लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. भारतातील ऑनलाईन मार्केटमध्ये एकट्या शाओमीचा 35 टक्के वाटा आहे.
ऑक्टोबर महिन्यात केवळ एका आठवड्यात चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने भारतात 50 लाख स्मार्टफोनची विक्री करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीच्या या यशात दोन ई-कॉमर्स वेबसाईट्सचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमुळे शाओमीला हा रेकॉर्ड बनवता आला.







