उपमहापौर सुनील खडके यांनी दिले आश्वासन : प्रभाग ९ मध्ये केला दौरा
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील पांडुरंग नगरात असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग कुणीतरी इतर सामाजिक संस्थाचालक करणार असल्याची माहिती नागरिकांनी उपमहापौर सुनील खडके यांना दिली. परिसरातील नागरिकांच्या संमती शिवाय कुणीही जागा ताब्यात घेऊ शकत नाही. परिसरातील नागरिकांसाठी असलेली जागा त्यांच्यासाठीच राखीव राहील असे आश्वासन उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांना दिले.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ९ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, मयूर कापसे, विजय पाटील, माजी स्थायी समिती सभापती अँड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भरत कोळी, मनोज काळे, गजानन देशमुख आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

मुक्ताईनगर आणि निवृत्ती नगरात अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून नळ जोडण्या देणे अद्याप बाकी आहे. नागरिकांनी याबाबत तक्रार केल्याने उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता पुढील आठ दिवसात सर्व जोडण्या पूर्ण करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बजरंग बोगद्यापासून एसएमआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच्या गटारीचे काम अनेक महिन्यापासून रखडले असून कामाची प्रत्यक्षात पाहणी करून ते मक्तेदाराकडून लवकरात पूर्ण करून घेण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. हनुमान मंदिरासमोरील उद्यानात देखरेखीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत देखील महापौरांनी सांगितले. निवृत्तीनगरात नियमित साफसफाई होत नसल्याची समस्या देखील नागरिकांनी मांडली.

पांडुरंग नगरात गटारी नसल्याने परिसरातील सांडपाणी एका डबक्यात जमा होते. नागरिकांनी गटारीची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. तसेच एका गल्लीत अमृत योजनेची पाईपलाईन एका गल्लीत टाकण्याची राहून गेली असल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदावी आणि रस्ता सपाटीकरण करावे अशा सूचना दिल्या. तसेच अमृत योजनेची पाईपलाईन देखील लवकरात लवकर टाकावी असे सांगितले.
पांडुरंग नगरच्या वळण रस्त्यावर एका व्यक्तीच्या तीन ट्रक अनेक महिन्यांपासून पडून असल्याने त्याठिकाणी मद्यपी दारू पितात तसेच ट्रकच्या आडोशाला काही लोक शौचास आणि मूत्र विसर्जन करण्यासाठी जात असल्याने त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ ट्रक मालकाला बोलावून तंबी दिली तसेच ट्रक आठ दिवसात न हटविल्यास कारवाई करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.

प्रभाग ९ मध्ये नागरिकांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र भैय्या पाटील यांच्या घरी देखील उपमहापौर सुनील खडके व नगरसेवकांनी भेट दिली. आपल्या प्रभागातील समस्या सांगतानाच त्या सोडविण्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अँड.रविंद्र पाटील यांनी काढले. उपमहापौर व सर्व नगरसेवकांचा अँड.पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.







