जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे 2 वाजेपासून सापळा रचून वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे. एका वाळू माफियाने पोलिसांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तर नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण तब्बल १२ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दोन दिवसापूर्वी गिरणा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजले होते. त्याच्याच कारवाईचा भाग म्हणून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पो.कॉ. विनोद संदानाशिव, पो.ना. मिलिंद सोनार, पो.कॉ. प्रवीण पाटील, वसंत कोळी, होमगार्ड सुदर्शन पाटील, निखिल चौधरी, तुषार पाटील, राहुल पाटील यांच्या पथकाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस पथकाने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून पहाटे पाचपर्यंत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्याला पकडण्यासाठी नदीपात्रात सापळा रचला. यावेळी त्यांना एम.एच. १९ झेड. ५४१७ वरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (रा.सावदे प्र.चा, ता.एरंडोल), डंपर क्रमांक एम.एच. १९ बी.एम ७५५७ वरील चालक अनिल योगराज सपकाळे (रा. आव्हाने ता.जळगाव), डंपर क्रमांक एम.एच. १९ झेड ७५५७ वरील चालक भगवान सोमा सोनवणे (रा. बांभोरी प्र.चा धरणगाव), डंपर क्रमांक एम.एच. १९ बीएम ५६५६ वरील चालक सचिन शंकर पाटील (रा.शेंदुर्णी ता. जामनेर), डंपर क्रमांक एम.एच. २० सी टी ५२४७ वरील चालक सिद्धार्थ अशोक अहिरे (रा.पिंपळकोठा प्र.चा ता.एरंडोल), मोटारसायकल क्रमांक एमएच १९ २१४७ वरील वाॅचर म्हणून काम करणारे दोन मुले मुकुंदा राजू पाटील (रा.वैजनाथ, ता.एरंडोल), दीपक धनराज पाटील (रा. वैजनाथ, ता.एरंडोल) असे मिळून आले.
यातील डंपर चालक सिद्धार्थ अहिरे याने पोलिसांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणत्याही पोलीस कर्मचारीला दुखापत झाली नाही. सदरचे डंपर तहसील कार्यालय धरणगाव येथे सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आली आहे. डंपर चालक यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मालकांचे नाव आनंद सपकाळे, बाळू चाटे, उदय राजपूत, सचिन पाटील असे सांगितले.
गुन्ह्याच्या फिर्यादीत कुलभूषण पाटील (रा.जळगाव) याने मला पैसे द्या, मी नदीपात्रातून चोरलेली वाळू माझ्या ठेक्यावरून आणली, असे सांगून तुम्हाला त्याच्या पावत्या देतो असे सांगत सर्वांना एकत्र आणून संघटित गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले असे पोलिसांनी म्हटले आहे.
सदर गुन्ह्यात एकूण १२ आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव गुन्हा दाखल करण्यात आला असून २५ लाख १८ हजाराचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात ५ डंपर १ ब्रास वाळू मोटारसायकल, मोबाईल असा ऐवज आहे. यातील पाच चालक व दुचाकीवरील दोन पंटर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.