मुंबई (वृत्तसंस्था) – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. अध्यक्ष कुणीही असो, कारभार चुकीचा झाला तर चौकशी होणारच असं वक्तव्य बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी कसलीही चौकशी करा, आपण चौकशीला घाबरत नसल्याचं आव्हान महाविकास आघाडी सरकारला दिलं आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत. या निर्णयामुळे दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना मुंबै बँकेबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या 5 वर्षात या प्रकरणी कुठलीही चौकशी झाली नाही. मात्र, आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याबाबत चौकशी करण्याचे आदेश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत.
प्रवीण दरेकर हे सध्या यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपण कुठल्याची चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मुंबै बँक ही सातत्यानं नफ्यात आहे. तिला अ वर्ग दर्जा मिळाला आहे. या बँकेवर एकटा प्रवीण दरेकर नाही. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही प्रतिनिधी आहेत. पण गेल्या काही दिवसात आम्ही सरकारच्या अनेक घोटाळ्यांबाबत बोललो. सरकारला उघडं पाडण्याचं काम केलं. त्यामुळे सूडाचं राजकारण करत ही चौकशी करण्यात येत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ही चौकशी म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. उच्च नायालयानं या प्रकरणातील दोन याचिका फेटाळून लावत क्लीन चिट दिली आहे. असं असलं तरी आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं दरेकर यांनी आवर्जुन सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीनं छापे टाकले आहेत. काल त्यांच्या दोन्ही मुलांची चौकशी करण्यात आली. तर आज प्रताप सरनाईक यांनाही समन्स बजावण्यात आलं होतं. पण आपण क्वारंटाईन असल्याचं कारण देत, सरनाईक आज ईडी कार्यालयात गेले नाहीत. सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘तुम्ही सुरुवात केली, शेवट आम्ही करु’, ‘तुम्ही पत्ते पिसा, डाव आम्ही टाकणार’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे. तर चूक नसेल तर चौकशीला घाबरता कशाला? असा सवाल भाजपकडून करण्यात येत आहे. प्रताप सरनाईक हे काही साधूसंत नाहीत, असा टोलाही भाजप नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.







