नवी दिल्ली (वृत्तसंथा) – संपूर्ण जगाचं लक्ष सध्या कोरोना लसीवर आहे. भारतात काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यावर आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने लस नक्की कधी येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. देशात 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
‘कोरोनाविरोधाच्या लढाईचा हा अकारावा महिना आहे. जगभरात एकूण 250 लसींच्या कंपन्या आहेत. यापैकी 30 कंपन्यांची नजर भारतावर आहे. देशात सध्या पाच लसींची चाचणी सुरु आहे. 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात आपल्याकडे लस उपलब्ध होईल. सप्टेंबर 2021 पर्यंत 25 ते 30 कोटी भारतीयांना लस देण्यात आली असेल’, असा दावा हर्षवर्धन यांनी केला आहे.
‘सर्वातआधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यांनंतर फ्रंटलाईन वर्कर, पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स यांना लस दिली जाईल. त्यानंतर 62 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जाईल. मग 50 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जाईल. त्यानंतर कोमर्बिडिटीच्या रुग्णांना लस दिली जाईल’, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.
‘कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्व राज्य सरकार आणि नागरिकांना जागरुक राहण्यास सांगितलं गेलं आहे. सर्व नियमांचं सक्तीने पालन केलं जात आहे. स्थिती भयंकर असूनही नियंत्रणात आहे. देशातील 90 लाख रुग्णांपैकी 85 लाख रुग्ण ठीक झाले आहेत. भारताचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे’, असं हर्षवर्धन म्हणाले.
दरम्यान, कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनीदेखील सूचक वक्तव्य केलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येणारी ‘कोव्हीशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
‘कमी किमतीत उपलब्ध होणारी कोव्हिशिल्ड लस एका प्रकारच्या डोसमध्ये कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरत आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या डोसमध्ये 62 टक्के प्रभावी आहे. याबाबतची विस्तृत माहिती संध्याकाळी देण्यात येईल.’ असं अदर पुनावाला म्हणाले आहेत. तसेच, या लसचे वितरणदेखील लवकरच सुरु होईल असेही त्यांनी सांगितलं आहे.







