जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून तीन संशयित दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांना वरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून पीएसआय सुधाकर लहारे, पोहेकॉ. अनिल इंगळे, स्वप्नील देशमुख, रमेश चौधरी, रवी नरवाडे, संतोष मायकल , ईशान तडवी यांचे पथक रावण केले होते. वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीत गेलेली दुचाकी भुसावळ येथील संशयित आरोपी आदर्श उर्फ गोल्डन तायडे हा वापरात असल्याचे समजले. त्याला भुसावळ येथील डॉ. आंबेडकर नगरातून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक – एम.एच. १९, सी. एच. ४४२६) याविषयी विचारले असता त्याने एक वर्षांपूर्वी तळवेल शिवारातून साथीदारांसह चोरल्याचे सांगितले. सदर चोरी सागर बबन हुसळे रा. कंडारी व अलीम शेख अकील यांच्यासोबत केली आहे. दुचाकीची मूळ नंबर प्लेट काढून बनावट नंबर प्लेट (क्रमांक – एम.एच. १९, सी. एम. ८५६५) असा बदली केला होता. तिघेही संशयित आरोपींना वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.








