भुसावळला सीसीआय केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील सर्वश्रुत असलेले वैर पुन्हा एकदा भर कार्यक्रमात दिसून आले. त्यांच्यात कार्यक्रमात स्टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी सीसीआय केंद्राचे उद्घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्यान हा गंभीर प्रकार घडला.
बोदवड येथील सीसीआय केंद्राचे उद्घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमासाठी खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, कार्यक्रमाला येण्यास आ. चंद्रकांत पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते सीसीआय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आ. पाटील यांना त्याचा राग आल्याचे दिसले. उद्घाटन कार्यक्रमास थोडे थांबता आले नाही का? असे म्हणत त्यांनी स्टेजवरच संताप व्यक्त केला. यावर खासदार खडसे यांनी कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजेची होती. वाट पाहूनच मग कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा खासदार रक्षा खडसेंवर पलटवार केला. मला आधी सांगितले असते तर तुम्हीच घेतला असता कार्यक्रम, असं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.
माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. एकमेकांविरोधात त्यांनी अनेकदा निवडणूका लढविल्या असून यात खडसे यांनी विजय मिळविला आहे. यावेळी मात्र खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट मिळाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव केला होता.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. मुक्ताईनगर येथील निवडणूक लढून ते विजयी झाले होते. एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झालो आहे आणि महाविकास आघाडीत असतानाही खडसे यांना प्रवेश देताना मला विचारात घेतले नाही, म्हणून चंद्रकांत पाटील हे नाराज झालेले आहेत. भुसावळला गुरुवारी 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांची ही नाराजी अप्रत्यक्षपणे दिसून आली.







