जळगाव (प्रतिनिधी) – केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला होत असलेल्या विरोधाला प्रादेशिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. हे आंदोलन एकट्या पंजाब किंवा हरियाणाचं नाही तर देशभरातील शेतकऱ्यांचं आहे. हे दाखवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जळगावमध्ये बुधवारी रात्री स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
शेगाव-जळगाव रोडवर सावळा फाट्यानजिक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा, विदर्भात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये मदत द्या, सरकारने पीक विमा कंपन्यांना निर्देश देऊन 100 टक्के पीक विमा मंजूर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
कोल्हापुरात तगडा पोलिस बंदोबस्त
कोल्हापुरात आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील अंकली पुलावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना गनिमी काव्यानं आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
बुलडाणा-अजिंठा महामार्गावर रास्तारोको
तिकडे बुलडाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा-अजिंठा महामार्गावर देऊळघाट इथं रास्तारोको करण्यात आला. तब्बल 2 तास चाललेल्या आंदोलनामुळे बुलडाणा-अजिंठा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारे शेतकरांच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल, असा इशारा तुपकर यांनी दोन्ही सरकारला दिला आहे.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोल्हापुरात आज काँग्रेस ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅली काढली जाणार आहे. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता निर्माण चौकातून या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार आहे. निर्माण चौक ते दसरा चौकादरम्यान ही रॅली असणार आहे.