चार महिन्यात १४०० रुग्णांवर यशस्वी उपचार

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतांना माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या जी.एम.फौंडेशन कोविड केअर सेंटरने लोकांच्या मनातील भीती काढून त्यांना कोरोना मुक्त करण्यात यश मिळवले आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या कोविड सेंटरने कोविड रुग्णांची मने जिंकली होती. मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या व उपचार घेत असलेला शेवटचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.

जळगावातील शिरसोली रस्त्यावर रायसोनी इन्स्टिट्यूटच्या आवारात असलेल्या या जीएम फौंडेशनच्या कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी योगा, दिवसभरात मनोरंजनाचे कार्यक्रम, पोषक जेवण यामुळे हे कोविड सेंटर राज्यात लक्षवेधी ठरले होते.आ. गिरीश महाजन यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अचूक नियोजनामुळे कोविड केअर सेंटर लोकप्रिय झाले. या सेंटरमुळे आ. गिरीश महाजन यांची राज्यभरात स्तुती झाली होती. गणेश उत्सवात देखील शासनाचे नियम पाळून सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रुग्णांना मानसिक बळ देऊन कोरोना मुक्त करण्यात या कोविड सेंटरने महत्वाची भूमिका बजावली होती. लहान मुलासाठी विविध स्पर्धा, गीत गायन देखील आयोजित करण्यात आले होते. दवाखान्यापेक्षा हिलस्टेशन सारखे स्वरूप या सेंटरला प्राप्त झालेले होते.
कोविड सेंटरमध्ये असलेला नम्र वैद्यकीय स्टाफ, सिस्टर, स्वयंसेवक यांची सेवा लोकप्रिय ठरली होती. यामध्ये डॉ. मोनीसा शेख, डॉ. परमानंद पाटील, डॉ. भोजराज सावंत यांच्यासह परिचारिका, कक्षसेवक, तसेच आ. गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते अरविंद देशमुख, मनोज जंजाळ, शिवाजी पाटील, अक्षय जाधव यांनी रुग्णांची सेवा केली. लोकांचा या सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी कल होता. सदरचे कोविड सेंटर हे खाजगी असले तरी पूर्णपणे विनामूल्य होते. राज्यभरात या कोविड सेंटरचे कौतुक होत असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. आतापर्यंत १४०० रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहे. कोविड केअर सेंटरला नंदकुमार आडवाणी यांचे सहकार्य लाभले.







