जळगाव (प्रतिनिधी) – येथील सुप्रसिद्ध नृत्यगुरू डॉ.प्रदीकुमार महाजन यांचे अल्पशा आजाराने दि.२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता निधन झाले. प्रदीकुमार यांनी जळगावमध्ये अनेक नामवंत कलावंतांना नृत्याचे धडे दिले.त्यांनी नृत्यात पीएचडी करून डॉ.पदवी प्राप्त केली होती. त्यांना शनिवारी २४ रोजी जळगावातील कलावंतांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी प्रदीप कुमार यांच्याविषयी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. ते गायन, नृत्य, तसेच विविध कला क्षेत्रात अग्रेसर होते. मात्र त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. प्रदीप कुमार यांची गायन क्षेत्रात असलेली उंची पाहता त्यांनी निश्चितच लोकप्रियता मिळवली होती, असाही सूर यावेळी उमटला. यावेळी कोरिओग्राफर नरेश बागडे म्हणाले की, प्रदीप कुमार हे जळगावातील कलाक्षेत्राचे चालते – बोलते व्यासपीठ होते. अनेक गाण्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गायन व नृत्यकला शिकविली. माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला नृत्य कलेत पारंगत करून रोजगारक्षम बनविले. कलावंत असले तरी, त्यांच्यातील जिवंत माणूस हा सुख – दुःखात धावून जायचे असेही शेवटी बागडे म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ कलावंत रतनकुमार थोरात, कैलास परदेशी, नरेश बागडे, बी आनंदकुमार, संजय मोती, भानुदास जोशी, योगेश मर्दाने, भगवान पाटील, विकास जोशी आदी उपस्थित होते.








