जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञांना पाच महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे त्यांनी शुक्रवारी २३ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २९ मे पासून आजपर्यंत कंत्राटी तत्वावर असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांना एक रुपया देखील वेतन मिळालेले नाही. टाळेबंदीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी दिवसरात्र काम केले. मात्र, आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे वेतन देण्यात यावे आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये समाविष्ट करण्यात यावे. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदनावर सतीश सोनवणे, सीमा गावंदे, मधुकर शिरसाठे, प्रांजल पाटील, अमोल चौधरी, मनोज पाटील, ज्योती जाधव, गौरव चौधरी यांच्या सह्या आहेत.







