तहसीलदारांना दिले निवेदन

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील पारोळा येथे मंगळवारी २० रोजी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
संघटनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सप्टेंबर ते आँक्टोबर या दोन महिन्यात तालुक्यातील सर्वच मंडळावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखला जाणारा कापूस पिक कैऱ्यासह सडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ज्वारी, मका, बाजरी व इतर कडधान्य याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे. पिक विमा मंजूर करुन कापूस, मका,ज्वारी व बाजरी ह्या पिकांना जास्तीत जास्त रक्कम मिळावी. नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकरात लवकर अदा करण्यात यावे. रब्बी हंगामासाठी विजेचा पुरवठा पुर्ण क्षमतेने व सुरळीतपणे करावा व विजपुरवठा दिवसा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शेतकरी संघटना युवा अध्यक्ष सुनील देवरे, उपाध्यक्ष दत्तू पाटील, सचिव नितीन देसले, सहसचिव भुषण पाटील, संघटनेचे प्रवक्ता भिकनराव पाटील, कायदेविषयक सल्लागार अँड.भुषण माने, वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ.प्रशांत बागुल, संघटक महेंद्र पाटील, पारोळा शहराध्यक्ष प्रकाश खाडे, शहर कार्याध्यक्ष युवराज पाटील, शहर युवा अध्यक्ष निलेश चौधरी, महेश चौधरी, मंगेश चौधरी, विलास चौधरी, प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.







