चिन्याचा मृत्यू छातीत मार लागल्यामुळे ;

धुळे कारागृह शिपाईचा वरिष्ठांकडे अर्ज
जळगाव ( प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृह येथे ११ सप्टेंबर रोजी कैदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक आणि तुरुंगाधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी धुळे जिल्हा कारागृह येथील शिपाई अनिल सुरेश बुरुकुल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यासह उच्च न्यायालयातदेखील याचिका टाकली असल्याचे अनिल बुरुकुल यांनी सांगितले. चिन्याच्या शवविच्छेदन अहवालात छातीत मार लागल्यामुळे मृत्यू झाला असे स्पष्ट म्हटले आहे. छातीत मार लागल्यामुळे मृत्यू होणे हे संशयास्पद आहे, असेही तक्रार अर्जात बुरुकुल यांनी म्हटले आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल एका गुन्ह्यात चिन्या जगताप हा जिल्हा कारागृहात होता. ११ सप्टेंबर रोजी त्याला गंभीर अवस्थेत कारागृहातून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तो मृतावस्थेत दाखल झाला होता. याप्रकरणी अनिल बुरुकुल यांनी १४ ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, पुणे, औरंगाबादचे कारागृह उपमहानिरीक्षक, मुंबई येथील राज्य मानवाधिकार आयोग, धुळे येथील तुरुंग अधीक्षक यांना अर्ज पाठविला आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनाही पत्र पोस्टाने पाठवले आहे.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, जळगाव जिल्हा कारागृहमध्ये अनेक गंभीर प्रकार घडून देखील वरिष्ठ दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्याकडे गेलेल्या तक्रारींविषयी ते गंभीर नसतात. त्यात आणखी एक दुर्देवी घटना चिन्या जगतापच्या मृत्यूची घडली आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी चिन्याच्या शवविच्छेदन अहवालात छातीत मार लागल्यामुळे मृत्यू झाला असे स्पष्ट म्हटले आहे. छातीत मार लागल्यामुळे मृत्यू होणे हे संशयास्पद आहे. तसेच नशिराबाद पोलिसांनी कैद्याच्या नातेवाईकांची तक्रार असताना आणि सबळ पुरावे असताना त्यांनी फक्त अकस्मात मृत्यू दाखल करणेदेखील संशयास्पद आहे. तसेच चिन्या जगतापच्या कुटुंबीयांची कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी आणि इतरांविरुद्ध तक्रार असल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी बुरुकुल यांनी केली आहे.
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यास विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याबाबत शासनाचे, न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र येथे व्यवस्थित वेळकाढूपणा करून प्रकरण दडपण्याचा हेतूने दोषी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचे देखील बुरुकुल यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.







