रावेर (प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बोरखेडा येथील पीडितेच्या कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भेट घेतली. यावेळी खडसे आणि देशमुख यांच्यात चर्चा देखील झाल्याची माहिती मिळाली.

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्येमुळे समाजमन सुन्न झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या गुन्ह्यात, कठोर पावले उचलत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, शनिवारी १७ रोजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी बोरखेडा येथे दाखल झाले आहेत. एकनाथराव खडसे हे सुद्धा याच वेळी बोरखेडा येथे दाखल झाले. खरंतर ही राजकीय भेट नव्हे ; एका दुःखाच्या प्रसंगात हे दोन्ही नेते भेटत आहेत पण या दोन्ही नेत्यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्याची साधलेली वेळ ही आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे.






