नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – 10 लाख तरूणांना नोकऱ्या, मुलाखतींसाठी मोफत प्रवास आणि जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर अशी आश्वासनांची खैरात करणारा जाहीरनामा राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनने जाहीर केला. या महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि शक्तीसिंग गोहील आदी नेते यावेळी उपस्थित होते.
आमचा जाहीरनामा प्राण हमारा, संकल्प बदलाव का हा आहे. मी पूर्णत: बिहारी आहे. माझे डीएनए शुध्द आहे. मी घोषणा केली आहे, मी जर सत्तेत आलो तर पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 10 लाख तरूणांना रोजगार देईन. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लागणाऱ्या प्रवास खर्चाचा भारही सरकार उचलेल. गरजू लोकांच्या मदतीसाठी राज्यभरात कर्पुरी श्रमवीर सहायता केंद्रे उभारण्यात येतील, असे यादव म्हणाले. यावेळी त्यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
कॉंग्रेसचे सुरजेवाला म्हणाले, जर महागठबंधन सत्तेवर आले तर पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात केंद्राचे शेतकरीद्रोही तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करू. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनचे सरकार सत्तेवर येईल यात कोणतीही शंका नाही.
महागठबंधन जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे – पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 10 लाख तरूणांना नोकऱ्या, सरकारी परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणांचा प्रवास खर्च सरकार करणार, जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर बनवणार, शेतकरीद्रोही तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करणार, गरजू लोकांच्या मदतीसाठी कर्पुरी श्रमसहायता केंद्रे राज्यभर सुरू करणार, शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून राज्याच्या अंदाजपत्रकातील 12 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करणार. प्राथमिक शाळेत प्रत्येक 30 मुलांमागे एक शिक्षक तर माध्यमिक शाळेत 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमणार., प्रत्येक शाळेत कला, संगणक आणि क्रीडा शिक्षकाची नियुक्ती, स्मार्ट गाव योजनेतून प्रत्येक गावार एक डॉक्टर आणि नर्स असणारे रुग्णालय उभारणार.