यावल (प्रतिनिधी) – तालुक्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ह्या मोहीमेची पहिली फेरी पूर्ण झाली असून दुसरी फेरी दि. १२ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० ह्या कालावधीत ही मोहीम गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, प्रभारी ता. आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज तडवी, व वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र सावखेडासिम डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ह्या मोहीमेच्या दुसऱ्या फेरीस दहिगाव येथे प्रारंभ करण्यात आला.
या मोहिमेत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, असे आरोग्य पथक ( टीम ) तयार करण्यात आलले आहेत. ह्या पथकांनी कुटुंबातील सदस्यांची माहिती पहिल्या फेरीत घेतलेली असल्यामुळे ह्या दुसऱ्या फेरीमध्ये दररोज ७५ ते १०० घरांना भेटी देत आहेत. हे पथक घरांना भेटी देऊन दरवाजावर चिटकलेल्या स्टिकर वर कुटुंबातील माहिती ,भेटीची तारीख, व सही केली जात आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तींचे व ५० वर्षावरील व्यक्तींचे तापमान, ऑक्सिजन लेवल, व प्लस इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे . भेटीदरम्यान तापमान जास्त, ऑक्सीजन लेव्हल कमी, तसेच ताप, सर्दी, खोकला, आणि इतर लक्षणे असणाऱ्या, व कोमॉरबिड रुग्ण आढळलेल्या व्यक्तींना संदर्भित करण्यात येत आहे. सदर भेटीदरम्यान प्रत्येकास व्यक्तिगत संवादाद्वारे कोविंड प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.
मोहीम यशस्वितेसाठी आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक एल जी तडवी, राजेंद्र बारी, अनिता नेहते, आशा सेविका नीता महाजन, अर्चना मेढे, संध्या बाविस्कर, पुष्पा पाटील, भाग्यश्री महाजन, अंगणवाडी सेविका मंगला महाजन, मंदाकिनी पाटील, शकुंतला पाटील, छाया अडकमोल, मंगला तेली, व विजया महाजन आदी परिश्रम घेत आहेत.