देशव्यापी रॅकेटचा पर्दाफाश ; रामानंद नगर पोलिसांची
कारवाई ; ९ संशयितांपैकी दोघांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) –येथील रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीने देशव्यापी मोठे सायबर गुन्ह्याचे रॅकेट उघडकीस आणले असून याप्रकरणी २ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आणखी ७ संशयित आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ४१२ कोटी रुपये फसवणूक करण्यापासून वाचवले असून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असणारी एक टोळीचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्ड क्लोन करून ४१२ कोटी रूपयांची चोरी करण्याचा प्लॅन या टोळीने आखला होता. यात मनीष भंगाळे हा पंटर साक्षीदार बनला असून तो वगळता यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मनीष भंगाळे हा एकनाथराव खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आला असून नंतर त्याचे दावे खोटे ठरल्याने त्याला अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, मनीष भंगाळेच्या संपर्कात जळगावातील काही जण आले होते. या लोकांनी त्याला एटीएम कार्ड क्लोनींग करण्याची मागणी केली. मात्र त्याला ऑनलाईन फसवणूक करायची नसल्याने पोलिसांची मदत केली.
पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना सायबर गुन्हेगारी होत असल्याची कुणकुण होती. त्यानुसार त्यांनी सायबर तज्ज्ञांचे मत घेतले. तसेच हॅकर मनीष भंगाळे याची मदत घेण्याचे ठरले. त्यानुसार काही लोक बँकेचे स्क्रिनशॉट आणून देताहेत, डेबिट, क्रेडिट कार्ड स्क्रिनशॉट काढून पाठवताहेत, अशी माहिती भंगाळे याला मिळाली. ती निरीक्षक बडगुजर यांना त्याने सांगितली. त्यानुसार सायबर गुन्हेगारीविषयक माहिती पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी घेतली. त्यानुसार बँकेत जाऊन तेथील व्यवस्थापकांशी चर्चा करून माहिती घेतली. खातेधारकाची गुपित माहिती बँक मॅनेजरशिवाय कोणी देऊ शकत नाही, अथवा इतर मार्गाने माहिती चोरली असावी अशी माहिती बडगुजर यांना मिळाली.
याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी फिर्याद दिली आहे. सायवर क्राईमबाबत सखोल माहिती म्हणुन सायवर क्राईमबाबत आम्ही मनिष व त्याचा मित्र गौरव पाटील यांची मदत घेत असतो. दोन महिन्यांपूर्वी मला मनिष भंगाळे याने त्यास काही लोक विविध बँकांच्या खात्यांचे डिटेल्स पाठवुन त्यातुन मी ऑनलाईन पध्दतीने त्यांना पैसे काढुन दयावेत यावाबत दवाव टाकत असल्याबाबत सांगितले होते. मनीष व गौरव मला 01 ऑक्टोबर रोजी भेटल्यावर त्यांनी माझ्याशी, त्याला बैंक अकाऊंट तसेच डेबीट व क्रेडिट कार्डाची माहिती देतुन काही लोक त्यातुन ऑनलाईन मनी ट्रान्सफर करण्यास सांगत असल्याचे पुन्हा सांगितले. मनिषने त्याचेकडील मोबाईलमध्ये त्याला आलेल्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांचे डिटेल्स व काही खात्यांचे कॉम्प्युटर स्क्रिनचे स्क्रिनशॉट दाखविले. त्यात खातेदारांची इत्यंभुत माहिती होती. काही क्रेडीट व डेबिट कार्डाच्या दोन्ही बाजुकडील फोटो प्रतीदेखील दाखविल्या. पीआय बडगुजर यांनी त्या मोबाईलमधील खात्यांचे स्क्रीनशॉट, खात्यांची माहिती व क्रेडिट, डेबिट कार्डाच्या दोन्ही बाजुकडील फोटो प्रती बारकाईने पाहिल्या. त्यानंतर काही बैंकांत जावुन मिळविलेल्या माहितीत मला बँकेच्या खात्यांचे स्क्रिनशॉट व खात्याची माहिती खातेदाराव्यतिरीक्त इतरांना मिळू शकत नसल्याबाबत समजले.
या क्रेडिट, डेबीट कार्डाच्या क्रमांकासह गोपनीय सीव्हीव्ही नंबर व वैधता संपण्याची मुदत असलेल्या प्रती देखील चोरटया मार्गाशिवाय उपलब्ध होऊच शकत नसल्याबाबत माहिती मिळाली. अशी माहिती चोरटया मार्गाने घेवुन काही लोकांनी ऑनलाईन पैसे काढुन घेण्यासाठी पाठविल्याचे मनिष याने सांगितले. मिळालेली माहिती व मनिष याचे मोबाईल मधील माहिती व स्क्रिनशॉट पाहुन ऑनलाईन फसवणुक करुन मनी ट्रान्सफर करणारे हे रेंकेट असल्याची जाणीव निरीक्षक बडगुजर यांना झाली. मनिष याने देखील त्यास दुजोरा दिला. काही लोक दबाव आणुन व आमिष दाखवुन असे कृत्य करण्यास प्रवृत्त करत असल्याचे त्याने सांगितले. तो ऑनलाईन फसवणुक करून मनी ट्रान्सफर करण्यास इच्छुक नसल्याचे त्याने सांगितले. या रॅकेटचा पर्दाफाश करून फसवणुक होवु न देण्याचे पीआय बडगुजर, मनिष व गौरव यांच्यात ठरले व त्यांनी शक्य तेवढी मदत करण्याचे मान्य केले. ऐकमेकाच्या संपर्कात राहण्याचे आमच्यात ठरले होते.
त्यानुसार मनिषने त्यास जळगाव येथील आरोपी हेमंत पाटील वेळोवेळी मॅसेज करून त्यास ऑनलाईन मनी ट्रॅन्झेक्शन करण्याबाबत गळ घालत असल्याचे व ते काम करून देण्याच्या मोबदल्यात 20 टक्के देणार असल्याचेदेखील सांगितले होते. मनीषला गुजरातेतील चिखली आणि नाशिक येथे जाण्यास आणि संशयित आरोपींना भेटण्यास दबावातून भाग पाडले गेले होते. नाशकातील एक बँकेचा व्यवस्थापकही या रॅकेटमध्ये सहभागी होण्यास तयार झाला होता . त्यानंतर पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी रात्री सापळा रचून काही खात्यांवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचे प्रात्यक्षिक मनीष भंगाळेकडून करून घेतले होते . हे पैसे वर्ग होत असताना पोलिसांनी छापा टाकुन मनिषशी चर्चा करीत असलेले हेमंत पाटील, जळगाव व मोहसीन खान इस्माईल खान, रा. देवपूर, धुळे यांना त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र एमए१९ डीइ ५३०) व दोन मोबाईलसह ताब्यात घेतले.
यात एकूण ४ अब्ज, १२ कोटी, ५३ लाख, २७ हजार, ६५५ रुपयांचा होणार ऑनलाईन व्यवहार थांबविण्यात पोलिसांना यश आले असून यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे सतत मार्गदर्शन यामुळे पीआय बडगुजर यांना गुन्ह्याकामी मदत झाली आहे.
अटकेत असलेल्या दोन्ही संशयित आरोपीकडून गुन्ह्यातील कागदपत्रे हस्तगत केले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पोहेकॉ सतिश डोलारे, पो.ना. विनोद सोनवणे, शिवाजी धुमाळ, जयंत कुमावत, जितेंद्र तावडे, पो.कॉ. संतोष गिते या पथकाने कारवाई केली. पुढील तपास अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा हे करीत आहे. चौकशीनंतर त्यांनी टोळीबद्दल माहिती पोलिसांना दिली. या टोळीने बँक खात्यांची माहिती कशी संकलित केली हे पोलिसांच्या पुढच्या तपासात स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्ष फसवणूक आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी त्यांना मनिष भंगाळे यांच्या मदतीची गरज होती. या गुन्ह्यातील बाकीच्या ७ आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या सर्व आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०९ आणि १२० ( ब ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे .