शासकीय कर्मचाऱ्यांचे कोविड १९ स्वँब तपासणी शिबिर
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दहिगाव येथे गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, प्रभारी ता. आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज तडवी, व प्रा. आ. केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीगाव येथील शिबिरात ५४ शासकीय कर्मचाऱ्यांचे कोविड-19 तपासणीसाठी आर टी पी सी आर स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व गावात प्रत्येक विभागातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे कोविड-19 स्वॅब तपासणी करण्याचे दि. १४ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत नियोजन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
त्याप्रमाणे प्रा. आ. केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रातील गावात स्वॅब तपासणी शिबिराचे नियोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. त्यानुसार आज दहीगाव येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक, जि.प.मराठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा सर्व ५४ शासकीय कर्मचाऱ्यांचे आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले. स्वॅब डॉ. गौरव भोईटे यांनी घेतले तर त्यांना संजय तडवी, बालाजी कोरडे, राजेंद्र बारी, शिवप्रताप घारू, अनिता नेहते, व सर्व आशा सेविका यांनी मदत केली.