चोपडा (प्रतिनिधी)- जळगाव केंद्रामध्ये भाजपाच्या नरेंद्र मोदी शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे काळे कायदे मंजूर केले आणि कामगारांच्या विरोधात एक कायदा मंजूर केल्याने या सर्व काळ या कायद्यांच्या विरोध करून लवकरात लवकर ही कायदे रद्द करण्यात यावे. यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कडून प्रखर विरोध दर्शविला जात आहे. तसेच या कायद्याच्या विरोधात दोन कोटी शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या स्वाक्षऱ्याची मोहीमही सुरू आहे. याचाच भाग म्हणून दिनांक १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात व्हर्चुअल (आभासी) अशी शेतकरी बचाव रॅली संपन्न झाली जवळपास दोन तास ही रॅली चालली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ही रॅली यशस्वी करण्यात आली. हे तीनही कायदे शेतकऱ्यांना कसे मारक आहेत व कामगारांच्या विरोधातला कायदा कसा कामगारांच्या हाताचे काम हिरावून घेण्याचा आहे याबाबत जाणीवजागृती या आभासी रॅलीमध्ये करण्यात आले.
या शेतकरी आभासी रॅलीसाठी महाराष्ट्रात मुख्य केंद्र संगमनेर संगमनेर होते. यासोबत कोल्हापूर, अमरावती, नागपूर, पालघर अशा ठिकाणाहून ही शेतकऱ्यांना संबोधित करण्यात आले. शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी संगमनेर या प्रमुख केंद्रस्थानी कर्नाटकचे माजी मंत्री हनुमंता टी. पाटील, महाराष्ट्राचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव हे उपस्थित होते. तर कोल्हापूर येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम हे उपस्थित होते. आणि नागपूर येथून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते. तर औरंगाबाद येथून अमित देशमुख आणि अमरावती येथून महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर व पालघर येथून मुजफ्फर हुसेन हे या रॅली ला संबोधित करण्यासाठी उपस्थित होते. ही रॅली जवळपास दोन तास चालली. जळगाव येथील काँग्रेसच्या भवन मध्ये ही आभासी रॅली साठी आणि इतर चौदा तालुक्यांमध्ये स्क्रीन लावण्यात आलेले होते. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या रॅलीमध्ये सहभागी करून केंद्र शासनाने तीनही कायदे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेले असल्याचे पटवून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी यासाठी प्रचंड सहभाग नोंदविला. या रॅलीमध्ये जळगाव येथून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, प्रदीपराव पवार, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, चोपड्याचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, देवेंद्र मराठे, मुक्तदिर देशमुख, श्याम तायडे, विजय वाणी तर धरणगाव येथून महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव श्री डी जी पाटील, रावेर येथून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार शिरीष चौधरी या आभासी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅली मुळे शेतकऱ्यांचे उद्बोधन आणि प्रबोधन करून हे तीनही कायदे मारक असल्याने यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विरोध करावा व हे कायदे रद्द करण्यासाठी ही आजची आभासी रॅली संपन्न झाली असल्याचे जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अँड. संदीप पाटील यांनी कळविले आहे.