शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीत या ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे नाथाभाऊंना साकडे

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून आम्ही सामान्य कार्यकर्ते असून गेल्या महिन्याभरापासून तुमची राष्टवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाविषयी चर्चा सुरु आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करावा अशी विंनती राष्टवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन साकडे घातले. यामुळे खडसेंच्या पक्ष प्रवेशविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी खडसेंनी मंद स्मित करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. हे मंद स्मित नेमके काय सूचित करते हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाविषयी जळगाव जिल्हयातील नेत्यांची चाचपणी करुन चर्चा केली. त्यानंतर सोशल मिडीयावर देखील खडसेंच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष प्रवेशा विषयी व्हीडीओ तसेच चर्चा सुरु झाली. राजकारणात आम्ही सामान्य कार्यकर्ते असून शरद पवार यांच्या विचारांचे पाईक आहोत, यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा अशी विंनती आहे असे सांगून खडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमीत पाटील, कार्यालयीन चिटणीस संजय चव्हाण, जळगाव शहर माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजय बढे, निर्मल पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान एकनाथराव खडसे यांनी राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर स्मित हास्य केले आणि स्वागत स्विकारले. मात्र त्यांनी प्रवेश करण्याविषयी कुठलीच माहिती दिली नाही.







