केरळ (वृत्तसंस्था) – केरळ सोने तस्करीचे धागेदोरे आता अंडरवर्ल्डशी जोडलेले असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या आरोपींचे संबंध कुप्रसिद्ध गँगस्टर दाऊद इब्राहिमशी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एनआयएने बुधवारी कोची एनआयए कोर्टाला दिलेल्या लिखित उत्तरात हा संशय व्यक्त केला आहे. एजन्सीने याप्रकरणातील संशयित आरोपी रमीज केटी आणि सरफुद्दिन यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या जामिनाच्या अर्जाचा विरोध करताना हे उत्तर दिले. तसेच त्यांनी कोर्टाला जामिनाचा अर्ज फेटाळण्याचीही विनंती केली.

सोन्याच्या तस्करीचे प्रकरण ५ जुलै रोजी समोर आले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक डिप्लोमॅटिक बॅगेज पकडले होते. हे बॅगेज संयुक्त अरब अमिरातीतून पाठवण्यात आले होते. विदेश मंत्रालयाच्या परवानगीनंतर हे बॅगेज उघडले गेले. तपासानंतर यात जवळपास १५ कोटी रुपये किंमतीचे ३० किलो सोने मिळाले होते. एनआयएने याप्रकरणी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांच्यासह काही अन्य लोकांना आरोपी केले होते.
एनआयएने कोर्टात सांगितले, “दोन्ही संशयितांनी टांझानियाची यात्रा केली होती. या आफ्रिकेतील देशांतील बंदुका विकणाऱ्या दुकानांमध्ये ते गेले होते. टांझानियामध्ये रमीज याने हिऱ्यांचा व्यापार करण्याचा परवाना मिळवण्याचे प्रयत्न केले होते. नंतर ते यूएईला पोहोचले. तिथून सोन्याची तस्करी करण्यासाठी ते केरळला आले. टांझानिया आणि दुबई या दोन्ही देशांमध्ये दाऊद इब्राहिमची डी-गँग कार्यरत आहे. टांझानियामध्ये डी-कंपनीसाठी फिरोज नामक एक दक्षिण भारतीय इसम ओअॅसिस पाहतो. आम्हाला संशय आहे की, आरोपी रमीज याचे धागेदोरे डी-कंपनीशी आहेत.”
सोने प्रकरणी बुधवारी दोन संशयित स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांनी आपला जामिनाचा अर्ज परत घेतला. स्वप्ना सुरेश केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (केएसआयटीईएल) या संस्थेत काम करत होती. हे आयटी विभागाच्या आखत्यारीत येते, जी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अधीन राहून काम करते. तस्करीप्रकरणी तिचे नाव आल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. तिने यूएईच्या माजी वाणिज्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे. तर सरित कुमार तिरुवनंतपुरममध्ये यूएई वाणिज्य दूतावासात पब्लिक रिलेशन अधिकारी म्हणून काम करत होता. यांना ६ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
सोने तस्करीचा संशयित आरोपी रमीज याला २०१९मध्ये अटक झाली होती. त्याला १३.२२ एम. एम. बोर रायफलची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळीही सोन्याची तस्करी चालूच होती. एनआयएने कोर्टाला सांगितले की त्यांच्याकडे संशयित आरोपी सरफुद्दिनचा एक फोटोही आहे ज्यात तो टांझानियामध्ये हातात रायफल घेऊन दिसत आहे.
या प्रकरणी केरळ सरकारवर खूप टीका होत आहे. प्रथम या प्रकरणाचा तपास कस्टम विभागाने सुरू केला होता. स्वतःला वाणिज्य दूतासावाचा अधिकारी म्हणवून घेत सोने घेण्यासाठी पोहोचलेल्या सरित कुमारला अटक केली होती. त्याची चौकशीही झाली होती. राज्यातील काही अधिकाऱ्यांशी याच्या तारा जुळलेल्या होत्या. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आयएएस अधिकारी एम. शिवशंकर यांचेही नाव यात समोर आले होते. यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. नंतर विदेश मंत्रालयाने हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्द करण्यास मंजुरी दिली. यादरम्यान बुधवारी केरळ उच्च न्यायालयाने प्रवर्तन निदेशालयाला शिवशंकर यांना २३ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते.
काँग्रेसने जुलै महिन्यात म्हटले होते की, या प्रकरणाचे धागेदोरे दुसऱ्या देशांशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतासाठी विदेशातील माहिती एकत्र करणाऱ्या रॉ (रीसर्च अँड अॅनालिसिस विंग) या संस्थेलाही तपासात सामील करून घेतले जावे. केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी म्हटले होते- केरळच्या विद्यमान सरकारने जगात राज्याचे नाव बदनाम केले आहे. आमची मागणी आहे की रॉ, एनआयए आणि सीबीआयच्या संयुक्त पथकाने या प्रकरणाचा तपास करावा. काँग्रेसच्या आघाडीतील यूडीएफने आपल्या मागणीसाठी ऑनलाईन आंदोलनही केले होते.







