जळगाव (प्रतिनिधी) – एकनाथराव खडसेंना राजकारण कळतं, ते पक्षांतराचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावे, ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. त्यांना राजकारण अधिक कळतं,अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. खडसे पक्षावर नाराज असून त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी विचारले असता फडणवीस म्हणाले, खडसेंना आज मी भेटलो नाही किंवा काही चर्चाही केलेली नाही. मात्र, योग्य वेळी आपण त्यांच्याशी सकारात्मक चर्चा नक्कीच करु.कोरोनाचे गांभीर्य सर्वांनाच आहे. परंतु, एकीकडे सर्व अनलॉक होत आहे. राज्य सरकारने मदिरालयं सुरु करुन त्यांना उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची मान्यताही दिलीय. पण, मंदिरं सुरु करण्यात सरकारला काय अडचण आहे? देशात अन्य ठिकाणी मंदिरं सुरु झाली असून त्याठिकाणी कोरोनासंबंधी सर्व प्रोटोकॉल पाळून दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. मंदिरं बंद असल्याने त्याठिकाणी साहित्य विकणारे, चहा विकणारे, हॉटेल्स, स्थानिक प्रवासी वाहतूकदार अशा सर्वांचीच उपासमार होत आहे. त्यांना सरकारने मदतही केलेली नाही. त्यामुळे मंदिरं तातडीने सुरु करावी, त्यासाठी आम्ही आंदोलन छेडल्याचे फडणवीस म्हणाले.