पाटणा (वृत्तसंस्था) – बिहारमधील सत्तारूढ एनडीएमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा झडत आहेत. मात्र, एनडीए पुन्हा जिंकली आणि भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील, अशा शब्दांत त्यांच्या जेडीयूने चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जेडीयू, भाजप आणि लहान पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएपुढे सत्ता राखण्याचे आव्हान आहे. जागावाटपाच्या सुत्रामुळे आणि एनडीएतून बाहेर पडत लोजपने घेतलेल्या भूमिकेमुळे बिहारमध्ये सर्वांत मोठा पक्ष बनण्याची रणनीती भाजपने आखल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.
त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. जेडीयूच्या वाट्याला 122 तर भाजपच्या वाट्याला 121 जागा आल्या आहेत. जेडीयू आणि भाजपने आपल्या कोट्यातून इतर मित्रपक्षांना जागा दिल्या आहेत. त्यामुळे जेडीयू आणि भाजप प्रथमच जवळपास सारख्याच जागा लढवत आहेत.
निवडणुकीआधी एनडीएत असणाऱ्या लोजपने घेतलेल्या भूमिकेमुळे जेडीयूपुढील आव्हाने वाढली आहेत. जेडीयूविषयी मागील काही काळापासून उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या लोजपने त्या पक्षाविरोधात अनेक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याशिवाय, निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाण्याचे सूतोवाच लोजपकडून केले जात आहे. त्यामुळे लोजपचा वापर करून सर्वांत मोठा पक्ष बनण्याची खेळी भाजपकडून केली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
त्यापार्श्वभूमीवर, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी एका मुलाखतीत एनडीएने सत्ता राखल्यास नितीश यांच्याकडे नेतृत्व कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. एनडीए जिंकल्यास नितीश हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एनडीए एकत्रितपणे लढत आहे. कुठला पक्ष अधिक जागा जिंकणार हा काही विषय नाही, असे त्यांनी म्हटले.