जळगाव (प्रतिनिधी) – येथील चेतना व्यसनमुक्ती उपचार व समुपदेशन केंद्रातर्फ़े जळगाव ते सेवाग्राम व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली होती. त्याचा समारोप सेवाग्राम जिल्हा वर्धा येथे नुकताच झाला.हि रॅली सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्तीचा संदेश देत जळगावी परतली आहे. यावेळी विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम सांगून जनजागृती करतांना अनेक सुखद अनुभव चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या रॅलीतील कार्यकर्त्यांना आली.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि व्यसनमुक्ती सेवा सप्ताह म्हणून २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ” व्यसनमुक्तीची वारी, आपल्या दारी ” हि रॅली काढण्यात आली. जळगावात २ ऑक्टोबर रोजी आ. राजुमामा भोळे यांच्याहस्ते उदघाटन झाल्यानंतर रॅली जळगाव जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये फिरली. त्यात रॅलीतील कार्यकर्ते राजेंद्र दौड, मिलिंद नारखेडे, महेंद्र सपकाळे, दीपक पाटील यांनी गावागावांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम शरीरावर, मनावर कसे होतात हे तोंडी आणि हस्तपत्रकाद्वारे सांगितली. व्यसनामुळे संसाराची राखरांगोळी होऊन अनेकांचे आयुष्य उध्वस्त होतात. व्यसनामुळे मानसिक अध:पतन होते. असेही गावागावात सांगण्यात आले. या रॅलीला सातत्याने चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
काही सुखद अनुभव देखील कार्यकर्त्यांना आले. यात बोरगाव काकडे, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे अशोक वांजाळ, विष्णू काकडे, ह्यांनी अश्या रॅलीचे गावोगावी आवश्यकता आहे असे सांगितले. मोझरी येथील अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मोझरी, जि. अमरावती येथील प्रमुख जनार्दन पंथ , डॉ. आशिष बोथे, डॉ. राजाराम बोथे यांनी व्यसनमुक्ती मानवी जीवनात आयुष्याला मानसिकरीत्या मजबूत ठेवते असे सांगितले. सेवाग्राम, जि. वर्धा येथे शेवटी रॅलीचा समारोप झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गांधी कुटीमध्ये तेथील स्वयंसेवकांनी समारोप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथे कुटीचे सचिव मुकुंद म्हस्के, नामदेव गाडे, विजय धुमाळे, जयश्री पाटील, संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, रामेश्वर पुंडकर आदींनी रॅलीचे स्वागत केले.