मनोविकार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) – कोणतीही परिस्थिती ही तणावपूर्ण नसते. त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो, यावर येणारा ताण तणाव अवलंबून असतो. नेहमी सकारात्मक विचार करावा. ज्यावेळेला आपल्याला चिंता वाटायला लागते, त्यावेळी हळूहळू ताणतणाव आपल्या मेंदूत शिरकाव करायला लागतो, असे मार्गदर्शन मनोविकार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी केले.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक स्वास्थ दिनानिमित्ताने पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ” मानसिक आरोग्य सर्वांसाठी ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. प्रसंगी डॉ. मुंढे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानस तज्ज्ञ दौलत निमसे, समुपदेशक ज्योती पाटील यांनी ताणतणाव कसा हाताळावा याची माहिती दिली.
यावेळी डॉ. कांचन नारखेडे म्हणाले की, आपण जर सकारात्मकतेने परिस्थिती हाताळत गेलो, तर ताण-तणावांचा त्रास वाढत नाहीत आणि परिस्थिती आपल्या बाजूनं अनुकूल करण्यासाठी आपण तयार असतो. ताण जास्त आला तर सकारात्मक परिस्थितीने न बघता जर नकारात्मक परिस्थितीने आपण समस्या हाताळायला लागलो, तर ताण तणाव अधिकच वाढायला लागतो, असेही त्या म्हणाल्या. यावेळी मनोविकृती परिचारक विनोद गडकर, सामाजिक परिचारक मनोज नन्नवरे, मिलिंद बऱ्हाटे, चंद्रकांत ठाकूर उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी राज्य पोलीस निरीक्षक गोरख शिरसाठ, भारत चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.