नवी मुंबई (वृत्तसंथा) – सर्व भारतीयांसाठी विशेषत: महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर येत आहे. अमेरिकेती प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कुलचे डीन म्हणून भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी ते हा मानाचा पदभार स्विकारतील. 112 वर्ष जुनी ही संस्था असून त्याचे डीन म्हणून दातार यांची झालेली नियुक्ती भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. श्रीकांत दातार सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत.
श्रीकांत दातार हे मुंबई विद्यापीठ आणि अहमदाबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी आहेत. 1973 मध्ये श्रीकांत दातार यांनी मुंबई विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ते चार्टट अकाऊंटंट झाले. IIM अहमदाबाद मधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली आहे.
1 जानेवारी रोजी, तो स्कूलच्या डीनचा पदभार स्वीकारतील अशी माहिती अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी दिली. बॅकोव यांनी दातार यांचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, दातार एक अभिनव शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत.
श्रीकांत दातार हे व्यवसाय शिक्षणाच्या भविष्याबद्दल अग्रक्रमाने विचार करणारे विचारवंत आहेत. कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांना एचबीएसकडून मिळालेल्या सर्जनशील प्रतिसादामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एच.बी.एस. मध्ये त्यांनी जवळजवळ 25 वर्षे विविध पदांवर काम केले आहे आहे, अशी माहिती बॅकोव यांनी दिली.
रिसर्च आणि शैक्षणिक क्षेत्रात हार्वर्ड बिझनेस स्कूलचे योगदान मोलाचे आहे. श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या इतिहासातील 11 वे डीन असणार आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात दहा वर्षांच्या सेवेनंतर जून 2020 अखेर डीनशिप संपवत असल्याचे जाहीर करणाऱ्या नितीन नोहरीयांनंतर ते कार्यभार स्वीकारतील.