पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची माहिती
विश्वजीत चौधरी
जळगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रकरणांत आणि बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या महाभागांना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दणका देण्याचे ठरविले आहे. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही शेतकरी फसवणुकीचे एकूण १० तर बेरोजगारांच्या फसवणुकीचे १५ प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे लालच देऊन गंडविणारे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्याऱ्या व्यापाऱ्यांना आता धडा शिकविण्याचा आयजी डॉ. दिघावकर यांनी निश्चय केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात शेतकरी फसवणुकीची १४ प्रकरणे दाखल झाल्यानंतर विभागातील पाचही जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्यांनी त्वरित कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण २५ प्रकरणाची माहिती प्राप्त झाली असून त्यादृष्टीने तपास सुरु केला असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले. यामुळे बेरोजगार युवकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खाकीचा दणका आता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना, दलालांना बसणार आहे.