जळगाव (प्रतिनिधी) – येथील महाबळ परिसरातील भाजपचे पदाधिकारी असलेले भूपेश कुलकर्णी यांचा गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेदोन वाजता
महापालिकेचे कर्मचारी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी चक्क महापौरांच्या दालना जवळ वाद झाला होता. याप्रकरणी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दोघा जणांना शुक्रवारी भाजप पक्ष कार्यालयात बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
गुरुवारी महापालिकेत प्रभाग समिती सभापती पदासाठी निवड प्रकीया पार पडली. ही प्रकीया आटोपल्यानतंर महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण व भाजपाचे महानगर कार्यकारणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात महापौर दालना जवळ जोरदार बाचाबाची झाली. यानंतर चक्क महापौरांच्या कक्षात जाऊन देखील तेथे एकमेकांवर खुर्च्या उगारल्याचा प्रकार घडल्याची माहिती इतर कर्मचाऱ्यांकडून मिळाली. बाळासाहेब चव्हाण हे नगरसेविका व स्थायी समिती सदस्य ज्योती चव्हाण यांचे पती आहेत. ज्योती चव्हाण ह्या प्रभाग क्रमांक १३ या महाबळ परिसरातील नगरसेविका आहेत, तर भूपेश कुलकर्णी हा महाबळ परिसरातीलच भाजपच्या कार्यकारिणीवर पदाधिकारी आहेत.
याबाबत भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगीतले की, महापालिकेत झालेल्या वादाप्रकरणी भूपेश कुलकर्णी आणि बाळासाहेब चव्हाण यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पक्ष कार्यालयात बोलावले होते. त्यांचे म्हणणे तोंडी ऐकून घेण्यात आले. बाळासाहेब यांचा मुलगा बिल्डरशिप व्यवसायात तर भूपेश हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याबाबतचा किरकोळ वाद होऊन मनपात बाचाबाची झाली होती. हाणामारी, शिवीगाळ झाली नाही, असे दोघांनी सांगितले असल्याचेही महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.