जळगाव (प्रतिनिधी) – येथील जळगाव जिल्ह्यात 1144 गुन्हेगार 675 पोलीस कर्मचाऱ्यांना दत्तक देण्यात आले असून त्याबाबतचे एक स्वतंत्र रजिस्टर पोलिस स्टेशनला ठेवण्यात आले आहे. सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे एका कर्मचाऱ्यांकडे अनेक गुन्हेगार दत्तक दिले आहे. भविष्यात हे गुन्हेगार एका कर्मचाऱ्याकडे एक अशा स्वरूपामध्ये दिले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी दि. ८ रोजी दिली.
कोविड आजाराच्या साथीमुळे या महिन्यात येत असलेला नवरात्रोत्सवाकरिता शासनाच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दुर्गापूजा, नवरात्रोत्सव, दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवासाठी गरबा,दांडिया दांडिया आयोजित करू नयेत,अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
घरगुती व सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पद्धतीने असावी. मुर्त्यांची उंची मंडळांसाठी चार फूट तर घरगुती मूर्तीसाठी दोन फूट असावी. शक्यतो धातू, संगमरवर, शाडूमातीची मूर्ती असावी. पारंपरिक मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे. गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे.
मंडळांनी मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळावरील आरती घरीच करावी. ,प्रशासनाच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. तसेच मूर्ती संकलन केंद्र उभारावेत. मंडपात पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते नको.दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रम नियम पाळून प्रतीकात्मक स्वरूपाचा रावण दहन करावा. आवश्यक तितकीच व्यक्ती विसर्जनस्थळी राहतील, असेही पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवासाठी एक हजार होमगार्ड जिल्हाभरात नेमणूक करण्यात येत असून, दोन सुरक्षादलाच्या प्लाटून मागविले आहेत. तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार केले जाईल, असेही डॉ. मुंढे म्हणाले.







